जे दत्तभक्त नियमित गिरनार वारी करत आहेत त्यांच्यासाठी श्री. प्रमोद केणे काका हे नाव नक्कीच अपरिचित नाही. जनमानसात गिरनार वारीचे बीज पेरणारे हे आद्य प्रणेते आहेत. आपण परमपुज्य केणे काका आणि त्यांच्या कार्या विषयी थोडक्यात ओळख करून घेऊ.

परमपुज्य केणे काकांचा जन्म अलिबाग जवळ वसलेल्या चौल या गावी झाला. लहानपणापासून काकांना श्री दत्त प्रभुंची ओढ होती. काकांनी विज्ञानाची उच्च पदवी घेऊन मोठ्या हिमतीने रासायनिक उद्योग यशस्वीपणे चालवला याचबरोबर केवळ संसारातच मन न गुंतविता तीव्र दत्त भक्तीची कास आपण धरली. त्यामुळे अनामिक प्रेरणा आणि अद्भुत संकेत मिळून आपल्या जीवनाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने काकांनी दर पौर्णिमेस एक या प्रमाणे १०८ गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला. तो पुर्ण होऊनही आजही श्री दत्त कृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनार वारी अखंडपणे सुरु आहे.

गुजरात येथील जुनागढ जवळ असलेला गिरनारपर्वत हा श्री दत्तमहाराजांच्या जागृत स्थानांपैकी एक आहे. दहा हजार पायऱ्या (तीन हजार पाचशे फूट उंची) चढून गेल्यावर स्वयंभू पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्व प्राचीन काळापासून आहे.

श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून धंद्यातील संकटे, आर्थिक विवंचना, इत्यादी अडथळ्याची पर्वा न करता अढळ श्रद्धा, अपरिमित भक्ती व अतूट निष्ठा यांच्या बळावर आपली साधना अविरत चालूच ठेवली . तद्वत दृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती, निष्ठा आणि विज्ञान यांची सांगड घालणारे अनुभव आपल्या सर्वांना आश्चर्याचे तसेच भक्ती मार्गावर प्रेरित करणारे आहेत.

आज पर्यंत काकांच्या पौर्णिमा आणि पौर्णिमेव्यतिरिक्त मिळून ३००च्यावर गिरनार वाऱ्या संपन्न झाल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता केलेल्या या यज्ञाद्वारे काकांनी श्री दत्त प्रभूंचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी प्राप्त केलीत. परमपुज्य केणे काकांना गिरनार वारी करीत असताना अनेक विलक्षण अनुभव येत गेले. दहा हजार पायऱ्या आणि साडेतीन हजार फूट उंची चढून श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेत असता श्रद्धेतून प्रेरणा, प्रेरणेतून साधना आणि साधनेतून अनुभूती असा हा त्यांचा प्रवास सुरूच आहे.

याच बरोबर दत्त भक्तीचा प्रसार आणि सर्वसामान्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचे आपण व्रतचं घेतले आहे.

श्री गुरु दत्तात्रेयांनी परमपुज्य केणे काकांच्या भक्तीची आणि श्रद्धेची वेळोवेळी परीक्षा घेतली. यात काका कुठेही कमी पडले नाहीत. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून त्यांनी त्यातील मर्म शोधण्याचा कायम प्रयत्न केला. काकांनी ईश्वरी संकेत आणि ईश्वरी लीलांचे चिंतन केले. गिरनारची एकेक पायरी चढण्याचा गूढ अर्थ समजावून घेऊन तो भक्तांना सांगण्याचे कार्य काका करीत आहेत. त्यातील काही दिव्यानुभव परमपुज्य केणे काकांनी जसेच्या तसे साधकांसाठी 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती' या एकूण तीन भागांच्या पुस्तकात वर्णिले आहेत.

श्री दत्त आदेशानुसार लोककल्याणासाठी परमपुज्य काकांनी चौल, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे केळवण जांभा चिऱ्यांची, शिव पिंडीच्या आकारातील अदभूत अश्या "शिवदत्त मंदिराची", मार्च २०१६ मध्ये स्थापना केली व "जय गिरनार शिवदत्त मंदिर ट्रस्ट " या संस्थेची बांधणी करून धार्मिक व सामाजिक कार्यात सर्वाना सामावून घेतले व घेत आहात.

२०१८चा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापूर असो अथवा निसर्ग चक्रीवादळ चौल गावकऱ्यांना बसलेला फटका असो, अथवा महाडचा पूर असो. आपत्तीकाळात आपण पिडीतांचे आधार बनलात, हे करताना आपण सर्वांना सामाऊन घेतले

२०२०च्या कॉरोना महामारी च्या कठीण काळात परमपुज्य केणे काकांनी अलिबाग तालुक्यातील गावे, दुर्गम आदिवासी पाडे येथे अन्नदान आणि मोफत वैद्यकीय सेवा प्रदान केली. तसेच परमपुज्य केणे काकांनी याच महामारीच्या पार्श्वभूमीवर "शिवार्क" या संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून बनवलेला रोगप्रतिकार शक्तिवर्धक अर्काची निर्मिती केली. तीन लाख १००मिली शिवार्क च्या बाटल्या या मुंबई, अलिबाग, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, व नाशिक येथे गरजूंना वितरित केल्या आहेत. याचा लाभ सामान्य नागरिकां बरोबर रुग्णालये, स्वास्थ्य कर्मचारी, पोलीस यांनीही घेतला.

परमपुज्य केणे काकांनी साधकांना दैवी कार्यासाठी प्रेरित करून , मंदिर स्थापनेच्या आधी १०८ सत्यदत्त पूजा, अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ अशी महानुष्ठाने संपन्न केली.

तसेच मंदिर स्थापनेच्या नंतर या पवित्र स्थळी दरमहा विविध मासिक यज्ञ, जीव-ब्रह्म सेवे अंतर्गत नियमित आरोग्य शिबिरे, ध्यान शिबिरे, बाल संस्कार वर्ग काकांच्या मार्गदर्शना खाली होत आहेत. तसेच ५१ शक्तीपीठ - अखंड भारतमाता याग, १२ ज्योतिर्लिंग याग, देशासाठी ज्या क्रांतिकारकांनी, सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृती चेतविणारा क्रांतिसूर्य महायाग , असे बरेच राष्ट्रहिताला समर्पित महायाग परमपुज्य केणे काकांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाले व होत आहेत. डिसेंबर २०१९ मधे सलग १३ दिवसांचा दुसरा अतिरुद्र स्वाहाकार संपन्न झाला.

मंदिराच्या याच विस्तारित पवित्र भूमीत पवित्र गोशाळा, ग्रंथालय, यांची पण पायाभरणी झाली आहे. तसेच नियोजित वेद पाठशाळा , भक्त निवास, ध्यान मंदिरे उभारण्याचा संकल्प आहे.

परमपुज्य केणे काकांनी श्री. दत्तप्रभूच्या संकेतानुसार मंदिर परिसरातच दि. २६ मे २०२२ रोजी अखंड दत्तधुनी आश्रमाची स्थापना केली व तदनंतर तेथील धुनी अखंड प्रज्वलित आहे.

दि. १९ जानेवारी २०२३ रोजी दत्तधुनी आश्रमात सफेद संगमरवरी पाषाणात घडविलेल्या अत्यंत सुबक आणि प्रसन्न विष्णुस्वरूपातील श्री. दत्तमहाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. अखंड दत्तधुनी आश्रमाची स्थापना केल्यापासून सद्-भक्तांना येथे विविध पातळीवरील दिव्य अनुभूती येत आहेत.

परमपुज्य केणे काकां स्वःताहाच्या अनुभूतींवर आधारित प्रवचने आणि साधकांना मार्गदर्शन असे बहुयामी कार्य करीत आहेत. त्याच बरोबर काकांनी लिहिलेल्या "दिव्यत्वाची जेथे प्रचिती " या तीन भागात प्रदर्शित झालेल्या ग्रंथात काकांच्या गिरनार वारीतील अनुभव व त्यावर काकांनी केलेले मार्गदर्शनपर भाष्य वाचून साधकांना प्रचंड प्रेरणा मिळते आहे व मिळत राहील.

परमपुज्य केणे काकांची श्री दत्त चरणी असलेली संपूर्ण श्रद्धा, समर्पित भाव तसेच त्याला अनुसरून असलेले सत्कर्म, या सर्वांची सांगड हीच त्यांच्या यशश्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. काजव्यालाहि मार्गदीपक बनविणाऱ्या या किमयागाराला शतशः वंदन. अशा या उतुंग परंतु निरतिशय साध्या विभूतीला दीर्घायुष्य लाभो व आपल्या हातून आपल्या गुरूमाउली परमपुज्य केणे काकांची जास्तीच जास्त सेवा घडो हीच श्री दत्तचरणी प्रार्थना !

२०२५ - प्रत्येक महिन्यात येणारे यज्ञ / याग